पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सार्वजनिक – खासगी भागीदारीतून (पीपीपी) सुरू आहे. आता या मार्गाचा विस्तार शिवाजीनगरपासून लोणी काळभोरपर्यंत पीपीपी तत्वावर करण्याचा विचार सुरू आहे. याबाबतचा प्रकल्प व्यवहार्यता अहवाल पीएमआरडीएकडे सादर झाला आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर ह्या पुणे मेट्रो प्रकल्पाची उभारणी टाटा समूहासोबत केली जात आहे. या मार्गाचा विस्तार करण्यासाठी प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा मार्ग शिवाजीनगरपासून लोणी काळभोरपर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. याचबरोबर हडपसर ते सासवड रस्ता आणि रेस कोर्स ते स्वारगेट हा मेट्रो मार्गही प्रस्तावित आहे. हे मेट्रो मार्ग एकूण २३ किलोमीटरचे असणार आहेत. या मार्गांची व्यवहार्यता तपासण्यासाठी पीएमआरडीएने सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेने आता व्यवहार्यता अहवाल पीएमआरडीएकडे सादर केला आहे. त्यात या मार्गावर पीपीपी तत्वावर मेट्रो प्रकल्प शक्य असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा…गुंतवणुकीत पुणे १ नंबर! पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना टाकले मागे
पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत विभागीय आयुक्तांनी एकसमान असलेल्या विस्तारित मेट्रो मार्गांवर पीएमआरडीए अथवा महामेट्रो यापैकी एकाच संस्थेने काम करावे, असे निर्देश दिले होते. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) करण्याबाबत व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची सूचना त्यांनी पीएमआरडीएला केली होती. त्यानुसार, या मार्गाची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची पावले पीएमआरडीएने उचलली होती.