लोकसत्ता खास प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा आणि पर्यटन ठिकाणांचा आराखडा करण्यात येणार आहे. ११४ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. या ठिकाणी वाहनतळासह अन्य पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे.
पीएमआरडीएचे भौगोलिक क्षेत्रफळ ६ हजार २४६.२६ चौरस किलोमीटर एवढे असून त्यामध्ये नऊ तालुके आणि ६९७ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात अनेक तीर्थस्थळे असून तेथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
हवेली तालुक्यातील थेऊर येथील श्री चिंतामण गणपती मंदिर, पुरंदर तालुक्यातील हिवरे येथील महादेव मंदिर आणि कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर आणि भांबुर्डे येथील मळाईदेवी मंदिर, भोर तालुक्यातील नसरापूर येथील बनेश्वर महादेव मंदिर आणि दौंड तालुक्यातील डाळींबे येथील श्री विठ्ठल मंदिर यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. या आठ तीर्थस्थळांमध्ये विविध पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये सोलर व्यवस्था, वाहनतळ, निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहे आणि पोहोच रस्ते विकसित केले जाणार आहेत. पोहोच रस्ते विकसित केल्यामुळे तीर्थस्थळांच्या विकासालाही चालना मिळेल, असा दावाही पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ६७ कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्याअंतर्गत रस्त्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे. त्यासाठी नऊ ठिकाणे पहिल्या टप्प्यात निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मावळ, हवेली, मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांचा समावेश असून यातील पाच ठिकाणे ही मावळ तालुक्यातील आहेत. खडकवासला धरण, पळसे धबधबा, टीहे तलाव, श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र, भूगाव ते ताम्हिणी घाट रस्ता, तिकोना गड आणि पवना धरण, तुंग गड, लोहगड किल्ला, राजमाची या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी सुरक्षाविषयक कामे, वाहनतळांची उभारणी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
पीएमआरडीएचा हा महत्त्वाचा उपक्रम आहे. जिल्ह्यातील समृद्ध सांस्कृतिक वारशाला आधुनिक पायाभूत सुविधांची जोड या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यातून पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्र एकमेकांशी जोडण्याला प्राधान्य असेल. -डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए