पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला (इनर रिंग रोड) गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत १३ गावांमधील ११५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने दोन रिंग रोडची निर्मिती करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार बाह्य रिंग रोडचे (आउटर रिंग रोड) काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एसएसआरडीसी) देण्यात आले असून, अंतर्गत रिंग रोडचे काम (इनर रिंग रोड) पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. हा रिंग रोड ८३ किलोमीटर लांबीचा असून, त्यासाठी १४ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या रिंग रोडला गती देण्यासंदर्भात तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्त सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर जमिनीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीएमआरडीएकडून भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला ११३ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यासाठी ३० टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील ४४ गावांमधून ७४३.४१ हेक्टर जमीन या रिंगरोडसाठी आवश्यक आहे. हा अंतर्गत रिंग रोड पुणे-सातारा रस्त्याला नगर रस्त्याशी जोडणार आहे. त्यामध्ये ४२ जोड रस्ते, १७ पूल आणि १० बोगद्यांचा समावेश आहे. तसेच मेट्रो मार्गिकेसाठी पाच मीटर रुंदीची जागाही आरक्षित ठेवली जाणार आहे.
रिंग रोडचा पहिला टप्पा सोलू ते वडगाव शिंदे असा असून, नगर रस्त्यावरील कोंडी यामुळे कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. सोलू गावातील रिंग रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बाह्यवळण रिंग रोडला जोडला जाणार आहे. तसेच नगर रस्त्यावरील आळंदी ते वाघोली या ६.५ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी जमीन संपादित करण्यासही सुरुवात झाली आहे.
दरम्यान, अंतर्गत रिंग रोडचा ५.७ किलोमीटर लांबीचा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येत असून, तो लोहगावमधून जाणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून हा रस्ता विकसित केला जाणार असून, तो पीएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येणार आहे. एकूण ६५ मीटर रुंदीचा हा रस्ता पुणे ते लोहगावमार्गे पिंपरी-चिंचवडला जोडला जाणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे.
बाह्य रिंगरोडसाठी पंधरा ठिकाणी ‘इंटरचेंज’
बाह्य रिंग रोडची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने या रिंग रोडला जोडणारे पंधरा महत्त्वाचे इंटरचेंज विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी १४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मावळ, खेड, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा आणि मुळशी या नऊ तालुक्यांमधून प्रस्तावित रिंग रोड जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन इंटरचेंज तयार करण्याचे नियोजित आहे. एकूण १५ ‘इंटरचेंज’मध्ये १२ इंटरचेंज यापूर्वीच अस्तित्वात आहेत. तर तीन नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत एकूण १२.१० किलोमीटर लांबीचे रस्ते ‘रिंग रोड’शी जोडण्यात येणार आहेत.
या गावातील भूसंपादनाचा प्रस्ता
वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, कदमवाकवस्ती, सोलू आणि वडगाव शिंदे ‘पीएमआरडीए’च्या अंतर्गत रिंग रोडला गती देण्याच्या दृष्टीने भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात बैठक झाली. शेतकऱ्यांसमवेतही चर्चा सुरू झाली आहे. जागेची मोजणी करून लवकरच भूसंपादन होईल.प्रभाकर वसईकर, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए