पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी-पीएमआरडीए) पुणे-सातारा, पुणे-नगर आणि सोलापूर महामार्गाना जोडणाऱ्या अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याचे काम नव्या वर्षांत फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल, असा विश्वास प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सातारा, नगर आणि सोलापूर जिल्ह्य़ांमधून पुण्यात प्रवेश करताना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्राधिकरणाकडून १२९ कि.मी. लांबीचा आणि १०० मीटर रुंद वर्तुळाकार रस्ता करण्यात येणार असून त्यासाठी १७ हजार ४१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच प्रकल्पासाठी १ हजार ४३० हेक्टर एवढय़ा जागेची आवश्यकता असून हवेली, मावळ, मुळशी आणि खेड तालुक्यांमधील ५८ गावांमधील २ हजार ३७ गटांमधील जागेचा समावेश आहे. प्रकल्पासाठी लागणारी जमीन नगररचना योजनेद्वारे संपादित करण्यात येणार आहे.

या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याची साडेसहाशे कोटींची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. या निविदेचेही दोन टप्पे करण्यात आले असून त्यामध्ये अडीचशे कोटींची निविदा चार पदरी दोन मार्गिकांसाठी तर चारशे कोटींची निविदा तीन बोगदे, दोन रेल्वे आणि एक मुळा-मुठा नदीवरील पूल यांच्याकरिता काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ३३.४ किलोमीटर प्रकल्पाचे काम आंबेगाव खुर्दपासून वाघोलीपर्यंत प्रस्तावित आहे. हा मार्ग चारपदरी दोन मार्गिकांचा असणार आहे. वर्तुळाकार रस्त्याच्या पाचशे मीटर अंतरावर दुतर्फा तब्बल एकोणीस नगररचना योजना (टाउन प्लॅनिंग स्कीम) राबविण्यात येणार असून त्यांपैकी पाच नगररचना योजनांचा इरादा जाहीर केला जाणार आहे.

‘जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असलेली एकूण एक हजार २८६ हेक्टर शासकीय जमीन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. वर्तुळाकार रस्ता डोंगरांच्या कडेकडेने जाणार असल्याने प्रत्येक ठिकाणी नगररचना योजना राबविणे शक्य नाही.

ही वैशिष्टय़े..

  • १२९ कि.मी. लांबीचा आठ पदरी रस्ता
  • संपूर्ण मार्ग सिग्नल मुक्त
  • नगररचना योजनेतील पाचशे हेक्टर जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी

Story img Loader