पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याचा सर्वंकष प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडे ते वडगाव शिंदे या दरम्यान पाच किलोमीटर रस्त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव पीएमआरडीएने जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत.
पीएमआरडीएने वर्तुळाकार रस्ता विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एकूण १२८ कि. मी. लांबीचा हा रस्ता होता. पहिल्या टप्प्यात तो ९० मीटर रुंदीचा होता. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्त्याप्रमाणेच तो ११० रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भूसंपादन करताना अनेक अडचणी येणार असून, खर्चदेखील वाढण्याची शक्यता आहे. तसेच या रस्त्यापासून १५ किलोमीटर अंतरावरूनच रस्ते महामंडळाचा सुमारे ११० रुंदीचा वर्तुळाकार रस्ता जाणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी अंतरावरून जाणारे हे दोन्ही रस्ते एकाच रुंदीचे करणे योग्य होणार नाही. त्यामुळे पीएमआरडीएच्या रस्त्याची रुंदी कमी करून ६५ मीटर रुंदीचा रस्ता करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानुसार नव्याने रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – पुणे: गौतमी पाटीलचा डान्स बर्थडे बॉयला पडला भारी; आयोजक बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल
असा असेल वर्तुळाकार रस्ता
प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता आठ पदरी असेल. त्यावर एकूण १५ उड्डाणपूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, पाच बोगदे प्रस्तावित आहेत. एकूण १२८ किलोमीटर लांबीचा हा रस्ता असला, तरी त्यांपैकी सुमारे ८८ किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. उर्वरित ४० किमी लांबीच्या रस्त्याचे काम रस्ते महामंडळाकडून होणार आहे, तर ५.७० किमी लांबीच्या रस्त्याचे काम महापालिकेच्या हद्दीतून जात असल्यामुळे ते महापालिकेकडून केले जाणार आहे.
भूसंपादनासाठी ५८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित
पहिल्या टप्प्यात सोलू ते वडगाव शिंदे या पाच कि. मी. रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पाला नुकतीच मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या सुधारित सुमारे १४ हजार कोटी २०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. त्यापैकी भूसंपादनासाठी सुमारे ५८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा – पुण्यात आज हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट संदेश
रिंगरोडच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सोलू ते वडगाव शिंदे या दरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठीचे भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. रिंगरोडच्या सुधारित खर्चाला नुकतीच मान्यतादेखील मिळाली आहे. – रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए