पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने अनधिकृत प्लाॅटिंगविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत खेड तालुक्यातील मौजे चऱ्होली खुर्द येथील सहा ठिकाणी अधिकृत प्लाॅटिंगवर कारवाई करण्यात आली. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीमध्ये अनधिकृत प्लाॅटिंग वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. शासनाकडील कोणतीही बिनशेती परवानगी न घेता ‘ले-आऊट’ करून फक्त तात्पुरते रस्ते दर्शविण्यात येतात. त्यामध्ये जागेचा ले-आऊट नकाशा मंजूर करून घेतला जात नाही. त्यामुळे अशा प्लाॅट्सना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने प्लाॅट खरेदीला अडचणी निर्माण होतात. या पद्धतीला अनधिकृत प्लाॅटिंग असे म्हटले जाते. त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘पीएमआरडीए’च्या सह आयुक्त डाॅ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी दिली.
मौजे चऱ्होली बुद्रुक येथील माऊली कृपा डेव्हलपर्स (गट क्रमांक ७३), दत्तकृपा डेव्हलपर्स (गट क्रमांक ३१५/२), शिवगणेश पार्क (गट क्रमांक ३२५), गिरीश लांडे, शिवगणेश पार्क (गट क्रमांक ३२५ मधील ५७ मीटर), विष्णू पार्क (गट क्रमांक ३०६) आणि ग्रीन व्हॅली पार्क या ठिकाणी ही कारवाई झाल्याची माहिती डाॅ. सूर्यवंशी-पाटील यांनी दिली. या ठिकाणी अंतर्गत रस्ता, सीमाभिंत (कंपाउंड वाॅल), अंतर्गत फेन्सिंग काढून टाकण्यात आले. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे आणि पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, रवींद्र रांजणे, शाखा अभियंता विष्णू आव्हाड, गणेश जाधव यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
अनधिकृत प्लाॅटिंगला बांधकाम परवानगी मिळत नसल्याने प्लाॅट खरेदी करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासून नागरिकांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन डाॅ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.