डॉ. संगीता बर्वे यांच्या कवितांचा समावेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : दृष्टिहीन मुले काव्याच्या आनंदापासून वंचित राहू नयेत या उद्देशातून त्यांच्यासाठी बालकविता सीडी स्वरूपात भेटीस येत आहेत. प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘उजेडाचा गाव’ आणि ‘रानफुले’ या संग्रहातील कविता दृष्टिहीन मुला-मुलींचा आनंद द्विगुणित करणार आहेत.

नागपूर येथील समदृष्टी क्षमता विकास एवम् अनुसंधान मंडळ आणि ब्लाईंड रिलिफ असोसिएशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ई-बुक्स क्रिएशन सेंटरतर्फे या सीडींची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘उजेडाचा गाव’ आणि ‘रानफुले’ या दोन संग्रहातील कविता या ऑडिओ सीडीच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आहेत. हे दोन्ही बालकवितासंग्रह ज्योत्स्ना प्रकाशनने प्रकाशित केले आहेत. नागपूर येथील डॉ. कल्याणी देशमुख आणि मुक्ता ऊर्फ वसू बर्वे यांनी या कवितांचे वाचन केले आहे.

अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेतर्फे भिलार या पुस्तकांच्या गावी शुक्रवारपासून (१८ जानेवारी) होत असलेल्या अखिल बारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बर्वे यांच्या सीडींचे प्रकाशन होणार आहे. याच संमेलनात अथर्व ढगे या शालेय मुलाच्या ‘हृदयसंगम’, आबा महाजन यांच्या ‘पोस्टर कविता’, विनोद सिनकर यांच्या ‘खाऊ हा पुरवून ठेवा’ या पुस्तकांसह उत्तम कोळगावकर यांच्या ‘जम्मतपूर’ आणि ‘छप्पापाणी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

पाडगावकरांची कविता

संगीताताई संगीताताई,

मुलं तुमच्या कविता वाचतील;

कविता वाचता वाचता

आनंदाने नाचतील!

या काव्यमय शब्दांत ‘उजेडाचा गाव’ संग्रहातील बालकवितांचे वाचन केल्यानंतर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी माझे कौतुक केले होते, अशी आठवण डॉ. संगीता बर्वे यांनी सांगितली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poem in cd format for blind children
Show comments