कविता करता येते म्हणून दररोज केवळ शब्दांचे बांधकाम करीत बसलो नाही. त्यामुळे माझे केवळ पाच कवितासंग्रह वाचकांसमोर आले आहेत. गेली पन्नास वर्षे कवितालेखन करतो आहे खरा. पण, मनासारखी कविता अजून जमलीच नाही, अशी भावना ज्येष्ठ कवी-गजलकार रमण रणदिवे यांनी व्यक्त केली.
रणदिवे यांच्या काव्यलेखनाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते काव्य जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर, अभिनेत्री-नृत्यांगना शर्वरी जमेनिस आणि प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते.
कोणत्याही कलाकारामधील अतृप्तीची भावना हीच त्या कलाकाराला पुढे घेऊन जात असते. बहुप्रसवता कलेला मारक ठरू शकते. त्यामुळे जेव्हा कविता आतून येते तेव्हा ती कागदावर उतरते आणि रसिकांच्याही काळजाला भिडते, असेही रणदिवे यांनी सांगितले. वडील प्रल्हाद रणदिवे, ज्येष्ठ कवी-गजलकार सुरेश भट आणि डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी या तिघांच्या पाठिंब्यावरच काव्य क्षेत्रामध्ये काम करता आले, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सुरेश भट आणि रमण रणदिवे यांच्या काव्यामध्ये शब्द वेगळे असले तरी आशयामध्ये समानता आहे. रणदिवे हे द्रष्टे कवी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मानवी जीवनात आनंदाप्रमाणेच दु:ख देखील आहे. दु:खाची झालर असल्याशिवाय जगण्यातील गंमत कळणार नाही. आनंदाचे तुषार फुलविण्याबरोबरच रणदिवे यांच्या कवितेतून वेदनाही तेवढय़ाच नेमकेपणाने आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही कलेसाठी साधना आवश्यक असते. संस्काराशिवाय साधना शक्य होत नाही, असे तळवलकर यांनी सांगितले. शर्वरी जमेनिस यांनी रणदिवे यांच्या कवितांचे वाचन केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा