पुणे : ‘कविता म्हणजे मनाचं पाझरणं असतं. त्याला वास्तवाचा स्पर्श झाला की कवीला अनुभवाचा तळ दिसू लागतो. सभोवतालच्या जगामध्ये अस्वस्थ करून टाकणाऱ्या बातम्या सातत्याने आपल्यासमोर येत आहेत. अशा वेळी माणूसपणाचा परीघ रुंदावत राहण्यासाठी कार्यरत राहणे हे कवीचे कर्तव्य आहे,’ अशी भावना ज्येष्ठ कवी-गज़लकार रमण रणदिवे यांनी व्यक्त केली. गज़ल हा एक काव्यप्रकार आहे. त्यामुळे गज़लकाराने स्वत:ला इतरांपेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ समजू नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ कवी-गज़लकार रमण रणदिवे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी (२१ सप्टेंबर) त्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित राहणार आहेत. रमण रणदिवे मित्र परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘ऋतू फुलांचा’ या गज़ल मुशायऱ्यामध्ये म. भा. चव्हाण, राजेंद्र शहा, ज्योत्स्ना चांदगुडे, ममता सपकाळ, प्रमोद खराडे, वैभव देशमुख, सुनीती लिमये, प्रा. उद्धव महाजन सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : डॉ. अजित रानडे यांना हटवण्याची प्रक्रिया ‘वेगवान’; प्रभारी कुलगुरूंचीही नियुक्ती

‘फुलं का फुलतात?’ तर, ‘माणसं अधिक निर्दयी होऊ नयेत म्हणून’, असे मी एका कवितेमध्ये म्हटले आहे. या तरल संवेदनाच माणसाचे माणूसपण टिकवून ठेवणार आहेत, असे सांगून रणदिवे म्हणाले, ‘माझ्यामध्ये कवितेचे बीज वडिलांनी रुजविले. मी संवादिनीवादक होतो. आवाजही चांगला होता. म्हणून वडिलांनी मला पं. यशवंतबुवा मराठे यांच्याकडे गाणे शिकायला पाठविले. गाणं शिकतानाच मी गुलाम अली, मेहंदी हसन यांच्या गज़ल ऐकत होतो. त्यांचे गायन आणि शब्दोच्चारण यातून मला गज़लची गोडी लागली. त्याच सुमारास सुरेश भट यांचा ‘रंग माझा वेगळा’ संग्रह वाचनात आला, अशी गज़ल लिहिता आली पाहिजे या ध्येयाने मी भट यांच्यासह डाॅ. सुरेशचंद्र नाडकर्णी, डाॅ. राम पंडित यांचे मार्गदर्शन घेतले. त्यावेळी ‘लोकप्रभा’मध्ये माझ्या गज़ल प्रसिद्ध होत असत. त्या सुरेश भट यांनी वाचल्या होत्या. पुढे माझा पत्ता मिळवून ते मला घरी भेटायला आले होते. जणू परमेश्वरच घरी आल्याची भावना झाली होती.

हेही वाचा :पुणे: दहा वर्षांचा मुलगा कालव्यात बुडाला, चेंडू काढणे जीवावर बेतले

जीवनाचा अनुभव कवितेतून मांडताना कवी समाजातील विसंवादालाच शब्दरूप देत असतो. अनुभव सच्चा असेल तर वाचकांच्या गळी उतरविण्यासाठी त्याला वेगळी मेहनत करावी लागत नाही. त्याचे शब्दच काव्यप्रेमींना आपलेसे करून घेतात. गेली ५४ वर्षे मी कवितालेखन करत आहे. पण, उत्तम कविता किंवा चांगली गज़ल अजून जन्माला आली असे वाटत नाही. हे मी विनयाने सांगत नाही तर, ते समजण्याचा जाणता अस्वस्थपणा माझ्याकडे आहे. – रमण रणदिवे, ज्येष्ठ कवी-गज़लकार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet and ghazal maker raman randive on humanity and poems pune print news vvk 10 css