चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे, असे मत हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ‘कवि की कल्पना से’ या विषयावर डॉ. कुमार विश्वास यांनी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.
कुमार विश्वास म्हणाले की, आज स्वतंत्र भारताच्या ७५ व्या वर्षी भारत जगातील आघाडीचा देश आहे. मात्र १०० व्या वर्षी भारत आध्यात्मिक आणि आर्थिक महासत्ता होईल. पण व्हॉट्सअॅप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही माया आहे. व्हॉट्सअॅपर संदेशांचा कचरा येऊन पडत राहतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मानवी संवेदनांवर हल्ला होणार आहे. मात्र मानवी संवेदनाच यंत्राच्या संवेदनेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुण्यातून आणखी एक दहशतवादी ताब्यात; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा सॅल्सबरी पार्क परिसरात छापा
पुस्तकांमुळे वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र वेब सीरिज, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे पिझ्झा, कपडे अशा गोष्टींवरील खर्च कमी करा, पण पुस्तके विकत घेऊन वाचा, असे आवाहनदेखील कुमार विश्वास यांनी केले. तर पुस्तकांमुळे आत्म्याची इम्युनिटी वाढते. वाचलेले मनात राहते आणि कधी ना कधी कामी येत असल्याचे त्यांनी सांगितले.