कविता हा कवीचा उत्स्फूर्त उद्गार असतो. कविता सुचते तेव्हा ती आशय आणि आकृतिबंध घेऊनच येते. हा पाऊस ओंजळीत वेचणे एवढेच कवीच्या हाती असते, असे मत प्रसिद्ध कवी-गीतकार संदीप खरे यांनी रविवारी व्यक्त केले.
राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. संदीप खरे, ‘धग’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारविजेती अभिनेत्री उषा जाधव, दिग्दर्शक रवी जाधव, पाश्र्वगायिका बेला शेंडे आणि छायालेखक संजय जाधव यांना प्रतापराव पवार यांच्या हस्ते तरुणाई सन्मान प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या अर्चना राणे आणि अजय राणे याप्रसंगी व्यासपीठावर होते. उत्तरार्धात योगेश देशपांडे यांनी पुरस्कारविजेत्या कलाकारांशी संवाद साधला.
हा पुरस्कार म्हणजे राजाभाऊंचा आशीर्वाद असल्याची भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली. उषा जाधव म्हणाल्या, नोकरी करण्यासाठी मी मुंबईला गेले. मैत्रिणीने सांगितले म्हणून मधुर भांडारकर यांच्याकडे ऑडिशन दिली. ‘ट्रॅफिल सिग्नल’ चित्रपटामुळे अभिनयाचे दालन खुले झाले. जाहिरातींसाठी काम केले. ‘कौन बनेगा करोडपती’च्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केल्यामुळे घरच्यांचा विरोध मावळला आणि त्यांनाही आपल्या मुलीचा अभिमान वाटला.
जाहिरात कंपनीतील मोठय़ा अधिकाराची नोकरी सोडून चित्रपटासारख्या अशाश्वत जगामध्ये प्रवेश केलेले रवी जाधव म्हणाले, तमाशा आणि नाच्या या विषयाला न्याय देणारा चित्रपट हा विषय हाताळण्याचे ठरवूनच ‘नटरंग’ची निर्मिती केली. युवा प्रेक्षक हाच ‘टार्गेट ऑडियन्स’ असल्याने वर्षांला एक याप्रमाणे ‘बालगंधर्व’ आणि ‘बालक-पालक’ या चित्रपटांची निर्मिती केली. आता ‘टाईम-पास’ या चित्रपटाचे काम सुरू आहे.
अभिनयासाठी ऑफर्स आल्या असल्या तरी गायन हेच माझे पहिले प्रेम असल्याची भावना बेला शेंडे यांनी व्यक्त केली. गाणं हे गाणंच असतं. गाण्याला भाषेचे बंधन नसते, असेही त्यांनी सांगितले. माझ्यातील कॅमेरामन हा दिग्दर्शकाला सहाय्य करणारा आहे, असे संजय जाधव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा