‘गेम’च्या वेडात गुंगलेल्या तरुणाईच्या सुरक्षिततेची भीती; सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीचाही प्रश्न
भारतात अधिकृत आवृत्ती उपलब्ध नसतानाही तरुणाईला वेड लावणारा ‘पोकेमॉन गो’ हा खेळ आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. एखाद्या ठिकाणी पोकेमॉन मिळतो हे कळल्यानंतर ते मिळवण्यासाठी जमणारे जथ्थे आणि रात्री अपरात्री पोकेमॉनचा शोध घेणाऱ्यांमुळे पोलिसांचे काम वाढले आहे. पोकेमॉन मिळाल्याच्या आनंदात काळ-वेळेचे भान न ठेवता जल्लोष करणाऱ्या गटांचा नागरिकांनाही त्रास होऊ लागला आहे.
कोथरूड येथील सिटी प्राइडचा भाग, बाणेर, औंध येथील स्पायसर महाविद्यालयाचा भाग, शनिवार वाडा, नदी काठ, खडकवासला धरणाचा भाग, पाषाण तलाव, फग्र्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कॅम्पातील एम. जी. रस्ता या भागांमध्ये आता काळ वेळेचे भान न ठेवता गर्दी दिसू शकते. ‘पोकेमॉन’ चा शोध घेणारी ही मंडळी आता पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरू लागली आहे. भारतातील बहुतेक साऱ्या शहरांमधील पोकेस्टॉप्सची म्हणजे पोकेमॉन मिळणाऱ्या ठिकाणांची माहिती कंपनीने काढून टाकली असली, तरीही अजून पुण्यातील अनेक पॉकोस्टॉप्स दिसत आहेत. एखाद्या ठिकाणी पोकेमॉन मिळत असल्याची माहिती व्हॉट्स अॅप, फेसबुक पेजेसच्या माध्यमातून झपाटय़ाने पसरते आणि त्या ठिकाणी पोकेमॉनच्या चाहते जमतात. त्यामुळे अशा पोकेमॉन वेडय़ांना हाकलण्याचे, जमलेले जथ्थे पांगवण्याचे कामही आता पोलिसांना करावे लागत आहे. केवळ याचसाठी मध्यरात्री जमणाऱ्या गटांवर काय कारवाई करावी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
मॉडेल कॉलनी, बाणेर, पिंपळे निलख, पिंपरी-चिंचवड, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, औंध या ठिकाणी काही रहिवासी सोसायटय़ांच्या परिसरात काही रेअर पोकेमॉन आढळले आहेत. त्याचप्रमाणे काही प्रकारचे पोकेमॉन हे खेळणाऱ्याच्या घराजवळ आढळतात. या पोकेमॉनचा शोध घेणाऱ्यांची त्रास आता सोसायटय़ांमध्येही होऊ लागला आहे. सोसायटीच्या परिसरात रात्री अपरात्री पोकेमॉन शोधणाऱ्यांमुळे वादही होऊ लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा