पुणे : धुळवडीला मद्य प्राशन करुन भरधाव वाहने चालवणाऱ्या १४२ वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. तर नियमभंग करणाऱ्या साडेअकराशे वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
धुळवडीला भरधाव वाहने चालवल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात होतात. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवर सोमवारी (२५ मार्च) २७ ठिकाणी विशेष नाकाबंदी करण्यात आली होती.
हेही वाचा >>>मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने
नाकाबंदीत ब्रीथ ॲनलायजर यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १४२ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. मद्य प्राशन करुन वाहन चालवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात आले, तसेच एकाच दुचाकीचा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी (ट्रिपल सीट) वापर केल्याप्रकरणी २२६ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली, बेशिस्तपणे वाहन लावणे, मोठ्याने हाॅर्न वाजविणे, सिग्नल तोडणाऱ्या ९३३ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.