पुणे शहरातील सराइत गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) तीन हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ७१४ गुन्हेगार मूळ पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
शहरातील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी मध्यरात्री विशेष मोहीम राबविण्यात आली. गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यातील पथके या कारवाईत सहभागी झाली होती. वेगवेगळ्या भागात पोलिसांनी कारवाई करुन तीन हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ७१४ गुन्हेगार मूळ पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी १८ जणांना अटक
बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १२ कोयते, चार तलवारी, चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. गंभीर गुन्ह्यात पसार असणारे आरोपी संतोष लक्ष्मण राठोड (वय १९, रा. शांतीनगर, वानवडी), सूर्यकांत उर्फ पंडीत दशरथ कांबळे (वय २६,रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी, दत्तवाडी) यांना अटक करण्यात आली.
चतु:शृंगी भागात बेकायदा हुक्का पार्लरवर छापा, दोघांना अटक
चतु:शृंगी भागात सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी अनिकेत अनंत देसाई (वय ३६), दिग्विजय सनातन नायक (वय २५, दोघे रा. गीतांजली बिल्डींग, ओैंध) यांना अटक केली. त्यांच्याकडून हुक्का पात्र तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली. ७२ लिटर गावठी दारू, दारु तयार करण्याचे साहित्य, २६० लिटर ताडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत शहरातील हॉटेल आणि लॉजची तपासणी करण्यात आली.
हेही वाचा : बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज बंद होणार; पुण्यात एका दिवसात ३४६ बुलेट चालकांवर कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, नामदेव चव्हाण, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, नम्रता पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे आदी मोहिमेत सहभागी झाले होते.