आज टी २० विश्वचषकमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. भारताला विजय मिळाल्याच्या आनंदात पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर तरुणांकडून हुल्लडबाजी करत वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. या हुल्लडबाजांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

हेही वाचा- पुणे: पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरीला

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर घोषणा देत अनेक तरुणांचे गट दुचाकीवरुन डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्ता , जंगली महाराज रस्ता, तसेच लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर आले. घोषणाबाजी करुन काहींनी वाहतूक अडवली. फर्ग्युसन रस्त्यावर गोखले स्मारक चौकातील वाहतूक विस्कळीत झाली. दिवाळी खरेदीसाठी महात्मा गांधी रस्ता तसेच फर्ग्युसन रस्त्यावर सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनी गोखले स्मारक चौकातील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. काहींनी चौकात फटाके फोडले. पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रस्ता वाहतुकीस मोकळा करुन देण्यास सांगितले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पांगविले. रात्री आठपर्यंत हुल्लडबाज तरुणांकडून घोषणाबाजी सुरू होती. कर्णकर्कश हाॅर्न वाजवत दुचाकीस्वार तरुण घोषणाबाजी करुन भरधाव वेगाने जात होते.

Story img Loader