पुणे : महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलमापक बसविण्यास शहरात विरोध होत आहे. मात्र, आता विरोध करणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता जलमापक बसविण्यास विरोध करणे नागरिक, गृहनिर्माण सोसायट्यांना महागात पडणार आहे.
शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, पाणी वितरणातील त्रुटी दूर व्हाव्यात, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. या योजनेची कामे तीन टप्प्यांत सुरू असून, नव्याने १८०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकणे, तसेच जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांची दुरुस्ती, निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना जलमापक बसविणे आणि साठवणूक टाक्यांची उभारणी करणे, अशा तीन टप्प्यांत ही कामे समांतर पद्धतीने सुरू आहेत. महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सन २०१७ मध्ये सुरू केले. आतापर्यंत ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेतून सोसायट्या, बंगल्यांमध्ये तीन लाख १८ हजार जलमापक बसविण्यात येणार आहेत. ज्या भागातील पाणी पुरवठा वितरणाच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे, अशा सोसायट्या, बंगल्यांना जलमापक बसविण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत एक लाख ३४ हजार ५८० जलमापक बसविण्यात आले आहेत.
हेही वाचा – धक्कादायक…येरवडा कारागृहातून कैद्याचे पलायन
सध्या शहराचा मध्यवर्ती भाग, सहकारनगर, पर्वती, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे आदी या भागात जलमापक बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये मध्यवर्ती भाग, सहकारनगर, कात्रज भागात जलमापक बसविण्याच्या कामास राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते विरोध करत आहेत. याशिवाय गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारीही विरोध करत आहेत. पाणीपुरवठा विभागाने योजनेबाबत माहिती देऊनही विरोध होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, समान पाणीपुरवठा योजनेचे ४० विभागांतील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तेथे जलमापक बसविण्यासह किरकोळ कामे बाकी आहेत. पण काही नागरिक जलमापक बसविण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सोमवारी स्पष्ट केले.