पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंद्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून एकाच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. याअंतर्गत पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून २६ आरोपींना अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी, देहूरोड आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्यासह ७ पोलीस निरीक्षक, ५ सहायक पोलीस निरीक्षक व ४० पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

बेकायदेशीर लॉटरी, जुगार, पार्लर, वेश्याव्यवसाय आदींच्या विरोधात केलेल्या या कारवाईत २६ व्हि़डिओ गेम मशीन, ७ एलईडी टीव्ही, मोबाइल, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींकडून ६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निगडीत ५ लॉटरी सेंटर चालकांवर कारवाई करण्यात आली. देहूरोडला साई व्हिडिओ गेम पार्लरवर छापा मारण्यात आला. याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली. वेश्याव्यवसाय प्रकरणात एका महिलेला वाकड पोलिसांनी अटक केली असून दोन पीडित महिलांची मुक्तता करण्यात आली आहे.