पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वर्षभरात पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई करून ३३ गुन्हे दाखल केले. तर मसाज पार्लरवर कारवाई करून गुन्हे शाखेने २० गुन्हे दाखल केले. तसेच शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांकडून १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. शहर तसेच उपनगरांत ४०० हून जास्त मसाज पार्लर आहेत. त्यातील काही मसाज पार्लर वगळता बहुतांश ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मसाज पार्लरची संख्या विचारात घेतल्यास पोलिसांच्या कारवाईचे प्रमाण कमी आहे. मसाज सेंटरमधील गैरप्रकारांबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी बाणेर, कोढवा, विश्रांतवाडी परिसरातील मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली. मसाज पार्लर चालकांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (प्रीव्हेन्शन ऑफ इमाॅरल ट्रॅफिकिंग ॲक्ट- पिटा) गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली.
हेही वाचा… बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्या टोळीचा पर्दाफश
पोलीस आयुक्तांचे आदेश
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बेकायदा धंदे, तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना नुकतेच दिले. गैरप्रकारांवर कारवाई न केल्यास खातेअंतर्गत कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
हेही वाचा…पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
परदेशी तरुणी मसाज पार्लरमध्ये
गेल्या काही वर्षांपासून शहरात ‘थाई स्पा’नावाने मसाज पार्लर सुरू झाले आहेत. या मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणी मूळच्या थायलंडमधील आहेत. थायलंडमधील तरुणी पर्यटन व्हिसा मिळवून भारतात येतात. पर्यटन व्हिसा मिळवणाऱ्यांना नोकरीची परवानगी मिळत नाही. मात्र, बऱ्याच पार्लरमध्ये थायलंडमधील तरुणी नोकरी करतात. भारतात प्रवेश केल्यानंतर वास्तव्याचा पत्ता दिला जातो. मात्र, बऱ्याच प्रकरणात तरुणी दुसऱ्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी (एफआरओ) विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाते. त्यांना देश सोडून जाण्याबाबत नोटीस (लिव्ह इंडिया) बजावली जाते. त्यानंतरही त्या देशाबाहेर गेल्या नाही, तर त्यांची हकालपट्टी (डिपोर्ट) केली जाते.