पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे.
बोपदेव घाट परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
हे ही वाचा…पिंपरी : महापालिकेची ‘पीपीपी’ तत्त्वातून फुगेवाडीत पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा
बोपदेव घाटातील टेबल पाॅईंट परिसरात गुरुवारी रात्री तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखविला. मित्राला मारहाण करुन त्याचा शर्ट काढला. शर्टने हातपाय बांधले. पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. तरुणाला एका झाडाला बांधून आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
हे ही वाचा…बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार; बलात्कारापूर्वी आरोपींकडून लूट
बोपदेव घाट हा परिसर निर्जन आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाइल विश्लेषण करण्यात येत अडथळे आले आहेत. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे.