पुणे : व्यावसायिक गॅसचा काळाबाजार पुन्हा एकदा समोर आला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी छापा टाकून गॅस सिलिंडरच्या तब्बल ७२ टाक्या पकडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी टेम्पो तसेच गॅस टाक्या असा दहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ लहू भोजने (वय ३१, रा. वडगाव बुद्रुक, मूळ. तुळजापूर) याला अटक केली आहे. तर, टाक्या विक्री करण्यास देणाऱ्या विकाश धोंडाप्पा आकळे (रा. वडगाव बुद्रुक) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७, २८८, ३ (५) सह जीवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगंडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली.

हेही वाचा >>>पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार

शहरात व्यावसायिक तसेच घरघुती गॅसचा काळाबाजार सातत्याने होत असल्याचे दिसत आहे. घरघुती गॅसमधून व्यावसायिकांना अवैधरित्या तो इतर टाक्यांमध्ये टाकून गॅस विकला जात आहे. दरम्यान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की, वडगाव भाजी मंडई येथून गोयल गंगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिलबंद व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैधरित्या विक्री होत आहे. त्यानुसार, भांडवलकर आणि पथकाने येथे धाव घेतली आणि सापळा रचून सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो टेम्पोत टाक्या घेऊन विक्री करत असल्याचे दिसून आले. अधिक चौकशीत त्याला या टाक्या मालक विकास आकळे यांनी दिल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी एचपी तसेच भारत कंपनीच्या तब्बल ७२ गॅस टाक्या आणि टेम्पो असा १० लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest one for black marketing commercial gas pune print news vvk 10 amy