पुणे : वादातून दोन तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सक्षम बगाडे, सागर सरोज यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत गौरव मरकड याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव याचा आरोपी सक्षम आणि सागर यांच्याशी वाद झाला होता. वाद मिटवण्याचा बहाणा करुन आरोपींनी गौरव आणि त्याच्या मित्राला सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अप्पर इंदिरानगर येथील शिवतेज क्रीडा संघ चौकात बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी गौरव आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने वार केले.
हेही वाचा >>> आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेले आरोपी सक्षम आणि सागर यांना अटक केली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा >>> ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर; नायडू रुग्णालयात विलगीकरणाची व्यवस्था अन् रुग्ण सर्वेक्षण
जमिनीच्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न
जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून तरुणाला गजाने मारहाण करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी ३३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत महेश रामदास घुले (वय ३६,रा. आई बिल्डींग, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले आणि त्यांच्या नात्यातील काही जणांचा जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद झाला होता. वादातून रविवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी तक्रारदार घुले यांचा भाऊ अक्षय रामदास घुले (वय २८) याच्यावर हल्ला केला. त्याला गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत अक्षय गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करत आहेत.