पिंपरी: पेन ड्राइव्हमधील खासगी छायाचित्रे, चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणा-या जीम प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली. मिथुन सोपान मुंगसे (वय ३६, रा. चक्रेश्वर मंदिर रोड, चाकण) असे अटक केलेल्या जीम प्रशिक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार ज्या जीममध्ये व्यायामासाठी जातो. तिथे आरोपी प्रशिक्षक आहे. तक्रारदाराचा पेन ड्राइव्ह जीममध्ये हरवला होता. त्यात त्याची खासगी छायाचित्रे, चित्रफित होती. आरोपी मुंगसे याने फिर्यादीला ब्लॅकमेल करुन पैसे उकळण्याचे नियोजन केले.
हेही वाचा… अपघाती मृत्यूबाबतची कागदपत्रे देण्यासाठी मागितली लाच; पोलीस उपनिरीक्षकासह वकील गजाआड
हरविलेल्या पेन ड्राइव्हमधील छायाचित्रे, चित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिली. त्याच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर मारुन टाकण्याची धमकी फोनद्वारे दिली. १४ हजार रुपयांची खंडणी उकळली. आणखी पैशांची मागणी केल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी मोबाईल क्रमांक आणि क्युआर कोडचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीला अटक केली.