पुणे: पुणे शहरातील उच्चभ्रू भागाची माहिती संकेतस्थळावर शोधून घरफोडी करणाऱ्या हैदराबादमधील चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली. चोरट्याने चतु:शृंगी आणि येरवडा भागातील उच्चभ्रू सोसायटीतून ६० लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पसार झालेल्या चोरट्याचा सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे माग काढून त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली.

नरेंद्र बाबू नुनसावत (वय २७, रा. मीर पेठ, हैदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सतीश बाबू करी (वय ३५, रा .हैदराबाद) पसार झाला आहे. नरेंद्रविरुद्ध तेलंगणा, हैदराबाद, तिरुपती पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत. येरवडा आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीत नरेंद्रने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

हेही वाचा… पुण्यातील साहसी पर्यटन केंद्रातील जलतरण तलावात बूडून तरुणांचा मृत्यू; दोन कोटी नुकसान भरपाईचे आदेश

कल्याणीनगर भागात बंद बंगल्यात शिरुन आरोपी नरेंद्र आणि त्याचा साथीदार सतीशने दहा लाखांचे दागिने आणि रोकड चोरुन नेली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरात दोन घरफोड्या झाल्या होत्या. चोरट्यांनी ५० लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. येरवडा पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. चोरट्यांनी जवळपास ३०० ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळले होते. तांत्रिक तपासात चाेरटे तेलंगणातील असल्याची माहिती मिळाली. नरेंद्रला तेलंगणातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नरेंद्र आणि साथीदार सतीशची कारागृहात ओळख झाली होती. तेलंगणात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याने दोघांनी पुण्यातील उच्चभ्रू भागाचा संकेतस्थळावर शोध घेऊन घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, असे बाेराटे यांनी सांगितले.

सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अमजद शेख, अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, किरण घुटे, सूरज ओंबासे, सागर जगदाळे यांनी ही कामगिरी केली.

पोलीस भरतीचे स्वप्न

आरोपी नरेंद्र आणि सतीशविरुद्ध तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात घरफोडीचे प्रत्येकी २५ ते ३० गुन्हे दाखल आहेत. आरोपी नरेंद्र एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो तेलंगणात चालक म्हणून काम करत होता. पोलीस भरतीसाठी तो प्रयत्न करत होता. पोलीस भरतीत तो उत्तीर्ण झाला होता. चारित्र्य पडताळणीत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न भंगले.

चोरट्यांचा स्वारगेट परिसरात मुक्काम

नरेंद्र आणि सतीश घरफोडी करण्यासाठी पुण्यात आले हाेते. दोघांनी स्वारगेट परिसरातील एका हाॅटेलमध्ये मुक्काम केला होता. घरफोडी केल्यानंतर ते रिक्षा बदलून भारती विद्यापीठ परिसरात गेले. तेथून ते पुन्हा हाॅटेलमध्ये परतले. पाेलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी पाच रिक्षा बदलल्या. सीसीटीव्ही चित्रीकरणात पकडले जाण्याची भीती वाटल्याने त्यांनी रिक्षा बदलून प्रवास केला.

Story img Loader