गेल्याच आठवड्यातील बातमी. चाळिशीतील एक व्यक्ती भारती विद्यापीठ परिसरात अफू विकायला येणार असल्याची खबर पोलिसांना लागली. त्यांनी सापळा रचला आणि या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे किती अफू मिळावी? किमतीच्या हिशेबात ५६ लाख रुपयांची! ही तो कुठून घेऊन आला, कोणाला विकणार होता, याचे तपशील चौकशीत समोर येतील. पण, ते आता तितकेसे हादरवत नाहीत. कारण, अशा अमली पदार्थांचे गिऱ्हाईक कोण आहेत, याचीही एव्हाना पुण्याला ओळख झाली आहे. अफू, गांजा, मेफेड्रॉन अर्थात एमडी अशा नावांना या व्यवसायात एक प्रचलित नाव आहे, माल! हा ‘माल’घेणारे जसे झोपड्या-चाळींमधून राहणारे आहेत, तसे मध्यमवर्गीय घरांतील आणि उच्चभ्रू बंगल्यांतीलही आहेत. म्हणजे हा खरेदीदार एका अर्थाने वर्गविहीन आहे. आर्थिक वर्गाची मर्यादा ओलांडून ‘सर्वसमावेशक’झालेले हे अमली पदार्थ शहरातील तरुणाई पोखरून काढताहेत, हे भीषण वास्तव आता सांस्कृतिक पुण्याला स्वीकारावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमारे चार दशकांपूर्वी डॉ. अनिता आणि डॉ. अनिल अवचट यांचे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र उभे राहत असताना, शहराला पडत असलेल्या व्यसनांच्या विळख्याची जाणीव पुणे शहरवासीयांना झाली होती का माहीत नाही, पण आता इतक्या वर्षांनंतर हा विळखा इतका घट्ट झाला आहे, की त्यात अडकलेल्यांची वेदना, नीट लक्ष दिले, तर अगदी आपल्या आजूबाजूलाही उमटलेली दिसेल. आपण हे किती गांभीर्याने घेतो, यावर हे शहर नशेबाजीच्या गर्तेत किती ढकलले जाणार, ते ठरणार आहे, हे आपण लक्षात घेऊ. व्यसनाचे दुष्परिणाम केवळ त्या व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात, ही शोकांतिका समजून घेतली, की त्यातील भीषण वास्तव समोर येते. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनापायी रस्त्यावर आलेल्या कुटुंबांच्या अनेक कहाण्या या शहराने पाहिल्या आहेत. या व्यसनापायी लोकांनी सख्ख्यांचा जीव घेतल्याच्या बातम्याही वृत्तपत्रांचे रकाने जवळपास रोज भरत असतात. त्याचे आणखी भीषण रूप गेल्या वर्षभरात समोर आले, ते म्हणजे या सांस्कृतिक राजधानीतून साडेतीन हजार कोटी रुपये इतक्या किमतीच्या अमली पदार्थांचे व्यवहार झाल्याची बातमी. पण, ही बातमीसुद्धा हिमनगाचे टोक वाटावे, इतक्या घटना त्यानंतर घडल्या. कुरकुंभ येथे मेफेड्रॉन तयार करणारा एक अख्खा कारखानाच आढळला. तेथून कोणाकोणाला कुठकुठपर्यंत हा ‘माल’पोचला वा पोचत असेल, हे सामान्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यानंतर दर काही दिवसांनी काही लाख वा कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडल्याच्या बातम्या येतच आहेत. पकडलेला एवढा, तर न पकडलेला किती, याचे गणित तर न केलेलेच बरे!

हे ही वाचा…पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार

साधारण १७-१८ वर्षांपूर्वी शहरातील एका झोपडपट्टीत एका स्वयंसेवी संस्थेने पाहणी केली होती. त्यात असे आढळून आले होते, की व्यसनाचे रूप केवळ अमली पदार्थ सेवनापुरते राहिले नसून, ज्याला ‘इंजेक्टिंग ड्रग युजर’म्हणजे इंजेक्शनची सुई खुपसून त्याद्वारे अमली पदार्थ शरीरात घेणारेही आता वाढू लागले आहेत. खरे तर ही गोष्ट दीडेक दशकापूर्वीची. पण, आता तेही इतके सर्रास सुरू आहे, की त्याचा वेग भोवंडून टाकणारा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे हे असे व्यसन आता केवळ निम्न आर्थिक स्तरापर्यंत मर्यादित नाही. अक्षरश: शालेय विद्यार्थ्यांपासून उच्चशिक्षित माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांपर्यंत याचा ‘विस्तार’झाला आहे. या सगळ्यांची कुरिअरने अमली पदार्थ मागविण्यापर्यंत मजल गेली आहे. शहरातील एका पबवर मध्यंतरी टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थ आढळून आले होते. असे पदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या पार्ट्यांचे रीतसर आयोजन करणारे गट आहेत. मध्यरात्रीपासून सुरू होऊन पहाटेपर्यंत चालणाऱ्या या अशा ‘पार्टी आफ्टर पार्टी’चे संयोजक समाज माध्यमांवरून याची निमंत्रणे पोचवतात! शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात आता स्मार्टफोन आले आहेत, तेव्हा ही कोवळ्या वयातील मुले या पदार्थांपासून किती जवळ आहेत, याचा विचार केला, तरी अंगावर काटा येईल. आणि, व्यसनांच्या या गर्दीत मुली वा प्रौढ स्त्रियाही मागे नाहीत. एखाद्या शहराची महानगराकडे वाटचाल होते, तेव्हा स्थलांतरितांची संख्या वाढणार, शहराची हद्द विस्तारणार हे जसे ओघाने येते, तसे रात्रजीवन हीसुद्धा त्या महानगराची गरज बनते. कारण, दिवस थकविणाऱ्या कामापासून रात्र जागविणाऱ्या वेळांपर्यंतची जीवनशैली ही त्या शहराची आर्थिक नाडी सांभाळत असते. अशा वेळी पब, बार येणे हे अपरिहार्य. मुद्दा असतो, तो त्यावरील नियंत्रणाचा. आणि, त्याहूनही महत्त्वाचा स्वनियंत्रणाचा. ‘लाख दुखों की एक दवा’ म्हणून आपण कशाकडे वळायचे आहे, याचे भान सुटणे हीच या गर्तेत खोल ढकलले जाण्याची पहिली पायरी आहे. आपल्या पाल्यांसमोर ‘सोशली’ ‘ड्रिंक’ करणाऱ्या पालकांपासून मित्र-मैत्रिणींच्या ‘आग्रहा’खातर ‘जरा’शी नशा करणाऱ्यांपर्यंत सगळेच या पायरीवरून घसरू शकतात. त्यामुळे वेळीच तोल सावरणे हाच उपाय.

हे ही वाचा…पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

आणि लेख संपवता संपवता : डॉ. अनिता अवचट यांना व्यसनमुक्ती चळवळीची प्रेरणा मिळाली, ती त्यांच्या ओळखीच्या एका कुटुंबातील व्यक्तीला लागलेल्या ब्राउन शुगरच्या व्यसनामुळे. या व्यक्तीला त्यातून सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना त्यांनी नंतर आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले. हे सांगणे अशासाठी महत्त्वाचे, की आपल्या आजूबाजूला जे घडते आहे, त्याकडे काणाडोळा होऊ नये. डॉ. अवचट दाम्पत्याने उभे केलेले काम आपण करू शकलो नाही, तरी त्याबद्दलची जाणीव निदान स्वत:त नक्कीच निर्माण करू शकतो. आपल्याला तेवढी तरी जबाबदारी घ्यायलाच हवी. siddharth.kelkar@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested man in his forties for selling opium near bharti university pune print news sud 02