लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: येरवडा भागात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गु्न्ह्यात गेले सात वर्षे फरार असलेल्या एकास गुन्हे शाखेने पकडले. अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे (वय २५, कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पाच डिसेंबर २०१६ रोजी एका कार्यक्रमात नाचत असताना जसप्रीतसिंग गुरुचरणसिंग बाला आणि अजय कांबळे यांनी महिलेशी अश्लील वर्तन केले होते. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांबळे दाखल गुन्ह्यात गेले सात वर्षे फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक कासेवाडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी गेले सात वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा कांबळे त्याच्या घरी आल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार आणि अभिनव लडकत यांना मिळाली.
हेही वाचा… पिंपरीतील पाच लाख मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण; अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा
पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. चाैकशीत त्याने येरवडा भागात एका महिलेशी अश्लील वर्तन केल्याची माहिती मिळाली. गुन्हा दाखल झाला तेव्हा आरोपी कांबळे अल्पवयीन होता. सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल पवार, अभिनव लडकत, विठ्ठल साळुंंखे यांनी ही कारवाई केली.