पुणे: घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रस्त्यावर सराफ व्यावसायिकावर गोळीबार करुन लुटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि वानवडी पोलिसांच्या पथकाने गजाआड केले. महापालिकेच्या कचरा संकलन गाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणारे तीन कामगार लुटीत सामील झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. लुटमार करणाऱ्या चोरट्यांकडून आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
सर्फराज शेख (वय २३), लखन अंकोशी (वय ३५, दोघे रा. रामटेकडी, हडपसर), रफीक शब्बीर शेख (वय ३०, रा. घोरपडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रतीक मदनलाल ओसवाल (वय ३०, रा. मुंढवा) असे जखमी झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात ओसवाल यांची सराफी पेढी आहे. ८ नोव्हेंबर रोजी सराफी पेढी बंद करुन रात्री साडेनऊच्या सुमारास प्रतीक आणि त्यांचे वडील मदनलाल बी. टी. कवडे रस्त्यावरुन निघाले होते.
हेही वाचा… फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग
त्यावेळी सर्फराज, रफीक, लखन आणि साथीदारांनी बी. टी. कवडे रस्त्यावर दुचाकीस्वार प्रतीक यांना अडवले. त्यांच्यादिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यांच्याकडील सोने लुटून आरोपी पसार झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून तपास सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तपास करुन तिघांना पकडले. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाेळकोटगी, संजय पतंगे, उपनिरीक्षक चैत्राली गपाट, लोहोटे आणि पथकाने ही कामगिरी केली.
झटपट पैसे कमाविण्यासाठी लूट
आरोपी सर्फराज, रफीक आणि लखन महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीवर कंत्राटी पद्धतीवर काम करत होते. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्यांनी सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा कट रचला. ८ नोव्हेंबर रोजी ते सय्यदनगर परिसरातील ओसवाल यांच्या पेढीजवळ गेले. मात्र, गर्दी असल्याने त्यांनी लूट करण्याचे टाळले. त्यानंतर सराफी पेढी बंद करुन निघालेल्या दुचाकीस्वार ओसवाल यांचा पाठलाग सुरू करुन गोळीबार केला. झटपट पैसे कमाविण्यासाठी आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तिघे आरोपी मित्र आहेत.