बारामती : बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. खून करुन पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी बारा तासात अटक केली.
अनिकेत सदाशिव गजाकस (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नंदकुमार पंजाबराव अंभोरे (वय १९), महेश नंदकुमार खंडाळे (वय २१), संग्राम दत्तात्रय खंडाळे (वय २१, रा. तांदुळवाडी, ता. बारामती) यांना अटक करण्यात आली. आरोपी नंदकुमार, महेश, संग्राम यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. वैमनस्यातून तिघांनी कट रचून अनिकेत याच्यावर कोयत्याने वार करुन गुरुवारी रात्री खून केला, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
हेही वाचा…दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
आरोपींनी गुरुवारी रात्री तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर अनिकेतवर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. त्यांना खून प्रकरणानंतर बारा तासात अकलूज परिसरातून अटक केली. आरोपींकडून दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ आणि पथकाने ही कारवाई केली. सहायक निरीक्षक गजानन चेंके तपास करत आहेत.