पिंपरी: तुकोबा आणि माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा नियोजित मार्ग तसेच लगतच्या परिसरात ड्रोन अथवा ड्रोनसदृश कॅमेऱ्याने छायाचित्रण करण्यास पोलिसांनी सक्त मनाई केली आहे. त्याचप्रमाणे, पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला फुले, फळे, खेळणी विक्रेते, हातगाडीवाले, पथारीवाले यांना बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> यंदा वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष सोयीसुविधा, महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून प्रारंभ

पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी व देहूत लाखो वारकरी येत असतात. ठरावीक क्षेत्रातच ही गर्दी एकवटलेली असते. ड्रोन तथा इतर माध्यमातून या गर्दीचे छायाचित्रण करण्याची शक्यता पोलिसांनी गृहित धरली आहे. वारीसाठी आलेले भाविक मुख्यत्वे ग्रामीण भागातून आलेले असतात. ड्रोनविषयी त्यांना माहिती नसते. अचानक हवेत ड्रोन उडताना पाहून गैरसमजातून वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडू शकतो.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आकडेमोडीत व्यग्र, मुंबईत बैठकांचं सत्र!

या पार्श्वभूमीवर, २२ जूनपर्यंत पूर्व परवानगीशिवाय छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आल्याचे पोलिसांनी कळवले आहे. त्याचप्रमाणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसणाऱ्या विक्रेत्यांना २३ जूनपर्यंत मज्जाव करण्यात आला आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.