पिंपरी-चिंचवडमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना उघडकीस आली असून,या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन विवाहित पुरुष पळून जाऊन विवाह करण्याच्या विचारात होते. मात्र, याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली आणि दोन संसार उध्वस्त होण्यापासून वाचले. या घटनेमुळे पोलीस आश्चर्य चकित झाले आहेत. दोन्ही विवाहित पुरुषांना मुले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यात एक फोन आला, माझा भाऊ एका पुरुषासोबत पळून जाऊन विवाह करणार आहे. आमची मदत करा अस फोनद्वारे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली व दोन्ही विवाहित पुरुषांना पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. परंतु, ते दोघे ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. हे प्रकरण काही वेळ पोलीस ठाण्यात सुरूच होतं. अखेर पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यानी समजावून सांगत प्रकरण मिटवले आहे.

हे दोन्ही विवाहित पुरुष  एका फ्लॅटमध्ये भेटायचे. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर, दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या वागणुकीवरून असं काही तरी प्रकरण शिजतं आहे, असा संशय आला होता. त्यामुळे त्यांच्या घरचे त्यांच्यावर पाळत ठेवत होते. ज्यावेळी दोन्ही पुरुष पळून जाणार असा संशय घरच्या व्यक्तींना आला, तेव्हा याची माहिती सांगवी पोलिसांना देण्यात आली.  घरच्यांची सतर्कता आणि पोलिसांच्या समुपदेशनानंतर दोन संसार उध्वस्त होण्यापासून वाचले आहेत.