काही प्रकरणामध्ये तक्रारदार, पंच व साक्षीदार फितूर होत असल्याने व न्यायालयाच्या मनामध्ये शंका निर्माण केली जात असल्याने आरोपीची निर्दोष सुटका होणाऱ्या खटल्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी तक्रारदार, साक्षीदार व पंचनाम्याचे चित्रीकरण करून डिजिटल पुरावा तयार करण्याच्या सूचना राज्यातील पोलिसांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी दिली.
दीक्षित हे पुण्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दीक्षित म्हणाले,की न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढविणे हा आमचा पहिला उद्देश आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चित्रीकरणाच्या माध्यमातून डिजिटल पुरावे तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पोलीस ठाण्यांच्या स्तरावर यापूर्वी शांतता, मोहल्ला कमिटय़ांच्या माध्यमातून कम्युनिटी पोलिसींग करण्यात येत होते. आता त्याच्याही पुढे जाऊन पोलिसांच्या कामामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पोलीस मित्र ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. चांगल्या वर्तणुकीच्या नागरिकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. नाकाबंदी, गस्त, वाहतूक नियमन व छेडछाड रोखण्यासाठी पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. पोलिसांसोबत काम करण्याची तयारी असणाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये आपले नाव व मोबाईल क्रमांक नोंदवावेत, असे आवाहनही दिक्षित यांनी केले.
राज्यातील सर्व अधीक्षक व पोलीस आयुक्त कार्यालयांना संकेतस्थळे सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, राज्य पोलीस दलाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात येत आहे. सायबर गुन्ह्य़ांबाबत पोलिसांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सीआयडीमार्फत प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले.
थेट माझ्याशी संवाद साधा!
पोलीस प्रशासन जनताभिमुख करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी त्यांच्या सूचना, तक्रारी पाठविल्या, तर त्याचे स्वागतच केले जाईल. नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संवाद साधावा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले. नागरिक त्यांच्या सूचना व तक्रारी ई-मेल, एसएमएस किंवा पत्राद्वारेही मला पाठवाव्यात, असेही ते म्हणाले.