पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वीसमोर आला होता. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्या विधानाच्या निषेधार्थ राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते.
तर ही घटना थांबत नाही तोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या. त्या पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या सर्व घडामोडी दरम्यान काल आरपीआय आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधाना प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. त्या प्रश्नावर पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले “राहुल सोलापूरकर यांनी विधान केलेल्या दोन्ही व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासल्या आहेत. त्यामध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही, राहुल सोलापूरकर यांनी आमच्याकडे सविस्तर खुलासा पाठवला असून त्याचे अवलोकन करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याहीपुढे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची स्थिती नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले, या प्रकरणी कोणी काय म्हणतंय यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, तर सध्या तरी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.