पोलीस आयुक्तांनी केला सत्कार आणि २५ हजारांचे बक्षीस जाहीर
पुणे : सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या सराइत गुन्हेगारांना चोप देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तांकडून पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची बक्षीस जाहीर केले आहे.
सिंहगड महाविद्यालय परिसरातील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविण्याची घटना नुकतीच घडली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील त्या वेळी गस्त घालत होते. सराईत गुन्हेगारांंनी कोयते उगारुन खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांची तोडफोड केली. खाऊ गल्लीतील हाॅटेलमध्ये शिरुन दहशत माजविली. वाहनचालक तसेच नागरिकांवर कोयते उगारले होते. त्यांनी एका तरुणावर कोयत्याने वार केला. या घटनेची माहिती मिळताच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी इंगवले आणि पाटील यांनी सराइतांना पाठलाग करुन पकडले. खाऊ गल्लीत त्यांना चोप दिल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईची दखल पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतली. नागरिकांवर कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या पोलीस कर्मचारी इंगवले आणि पाटील यांच्या कारवाईचे काैतुक त्यांनी केले. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत इंगवले आणि पाटील यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डाॅ. जालिंदर सुपेकर, राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी इंगवले आणि पाटील यांना २५ हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले.