पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे पुन्हा एकदा त्यांच्या वेशांतर करून केलेल्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून खंडणी उकळणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु, प्रसारमाध्यमांना घेऊन कारवाई केल्याने यावर प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी रोशन बागुल, गायत्री बागुल, पूजा माने यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विसेन्ट जोसेफ यांनी देहूरोड पोलिसात फिर्याद दिली.
नेमकं काय घडलं?
शनिवारी (२६ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास एका हॉटेलमधून रोशन बागुल या खंडणीखोर आरोपीला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून बेड्या ठोकल्या. संबंधित आरोपी हा कृष्ण प्रकाश आणि विश्वास नांगरे पाटील यांचा विश्वासू असल्याचं सांगत आम्ही त्यांचे अनेक जमिनीचे प्रकरण निकाली लावली आहेत, असा दावा करायचा. तो स्वतः ला सायबर क्राईमचा अधिकारी देखील म्हणवत होता.
“पोलीस आयुक्तांवर वेषांतर करून किरकोळ आरोपीला पकडण्याची वेळ का येते?”
आरोपी रोशन बागुल अशाप्रकारे धमकावून सर्वसामान्य नागरिकांकडून खंडणी उकळायचा. शनिवारी रात्री फिर्यादी विसेन्ट जोसेफ यांनी पैसे घेण्यास आरोपीला बोलावले होते. तेव्हा, वेषांतर केलेल्या कृष्ण प्रकाश यांनी आरोपीला रंगे हाथ पकडले. परंतु, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना वेषांतर करून किरकोळ आरोपीला पकडण्याची वेळ का येतेय? पिंपरी-चिंचवड पोलीस कमी पडतायेत का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कायमच प्रसिद्धीच्या झोतात
दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच प्रकाशझोतात राहतात. याआधी चाकण येथे डोंगराच्या विरुद्ध दिशेला पोलीस आयुक्तांनी झाडाचा बुंदा फेकून तीन आरोपींना पकडल्याच्या घटनेची जोरदार चर्चा झाली. चर्चेनंतर ते झाड नसून छोटं झुडूप असल्याचं पोलिसाकडून सांगण्यात आलं. त्यांच्या या कारवाईनंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकाही झाली.
कृष्ण प्रकाश यांनी एका महिला पत्रकार आणि फोटोग्राफरला सोबत घेत ‘मिया आणि बिवी’ बनून वेशांतर केलं होतं. त्यांनी रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलिसांची झाडाझडती घेतली होती. त्यामुळे देखील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती.