पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेबसाईटमध्ये नव्याने अनेक बदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर, पोलीस ठाण्याचे फोटो त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगारी फसवणुकीच्या बाबतचे जनजागृती चे विविध व्हिडिओ देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
सध्या डिजिटल युग आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तसेच सोशल मीडियाच्या ताकदीवर अनेक गोष्टी घडू शकतात. हेच लक्षात घेऊन आणि पोलिसांची मदत तात्काळ मिळावी म्हणून पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईट चे नव्याने लोकार्पण करण्यात आले आहे. या वेबसाईटमुळे अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. आता या वेबसाईटवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर, पोलीस ठाण्याचे माहिती मिळणार आहे. पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल देखील या वेबसाईटमध्ये आपण आपलं मत मांडू शकतो. भाडेकरूंची माहिती भरणे देखील आता सोपं झालं आहे.
घर बसल्या आपण भाड्याकरूंची माहिती भरू शकतो. यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. यामुळे गुन्हेगारास प्रतिबंध होणार आहे. वाहतुकीबाबत देखील वेबसाईटमध्ये दखल घेण्यात आली आहे. वाहतूक चलनाची माहिती आणि ऑनलाईन दंड भरण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. या सोशल मिडियाद्वारे सर्वसामान्य नागरिक थेट आता पोलिसांशी जोडला जाणार आहे. या नूतन वेबसाईटद्वारे नागरिकांच्या अधिक जवळ जाऊन त्यांना प्रभावी सेवा मिळावी हा हेतू असल्याचं पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितलं आहे. या लोकार्पण कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे आदी उपस्थित होते.