पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यात घट झाली आहे. आयुक्तालयांतर्गत २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सन २०२३मध्ये १६ हजार ४७७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर, मागील वर्षभरात (२०२४) खून, दरोडा, चोऱ्या, लुटमार, फसवणूक, वाहन चोरी, बलात्कार, विनयभंग अशा १५ हजार ९०९ गुन्ह्यांची नोंद झाली. सन २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये ५६८ ने गुन्ह्यात घट झाल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी-भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी, चिखली, चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव – दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, रावेत, म्हाळुंगे आणि नव्याने निर्माण झालेल्या काळेवाडी, बावधन, दापोडी, संत तुकारामनगर आणि सायबर सेल अशा २३ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
हेही वाचा…साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
का घटले गुन्हे?
मागील वर्षभरात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) ९९ टोळ्यांमधील ६०० गुंडांना अटक केली. ५५५ गुन्हेगारांना तडीपार करून ४७ संशयितांवर स्थानबद्धतेची कारवाई केली. वाहनचोरीच्या घटना रोखण्यासाठी ज्या ठिकाणी वाहनचोरीचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर दिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहनचोरीच्या गुन्ह्यातही ८९ ने घट झाली. पोलिसांनी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यांमध्ये तब्बल ५६८ ने घट झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा…व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी
आयुक्तालय हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी अशा गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व बालगुन्हेगारांची माहिती संकलित करून दिशा उपक्रमांतर्गत गुन्हेगारीतून त्यांचे लक्ष विचलित करून त्यांना खेळाकडे आकर्षित केले असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.