पिंपरी : ‘चाकण औद्योगिक पट्ट्यातील वातावरण भयमुक्त ठेवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून, कोणी धमकी दिल्यास उद्योजक, कंपनी व्यवस्थापकांनी तक्रार करावी. तक्रार आल्यावर गुन्हेगारांंवर कडक कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी दिली.

पोलीस आणि चाकण औद्योगिक पट्ट्यातील कंपनी प्रतिनिधींची खालुंब्रे येथील ह्युंदाई कंपनीत बैठक आयोजिण्यात आली होती. त्या वेळी आयुक्त चौबे बोलत होते. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, औद्योगिक तक्रार निवारण कक्षाचे सहायक आयुक्त विशाल हिरे, राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, नितीन गिते, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश चौडेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचआय) उपअभियंता दिलीप शिंदे, सहकामगार आयुक्त दिलीप वाळके, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल आदी या वेळी उपस्थित होते.

चौबे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील औद्योगिक परिसरात शांतता अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासन कारखानदारीच्या मागे उभे आहे. औद्योगिक तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी आयुक्तालयांतर्गत औद्योगिक तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षासाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. कंपनी व्यवस्थापन, कामगार, नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधल्यास पाच ते सहा मिनिटांत पोलीस मदत उपलब्ध होते. कंपनी व्यवस्थापनाने कंपनीचे आवार, बाहेरील परिसर आणि सार्वजनिक रस्त्यावर चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. कॅमेऱ्यांंची साठवणूक क्षमता किमान १५ ते ३० दिवसांची असावी.’ ‘दादागिरी, धमकी देत असल्यास म्हाळुंगे पोलीस ठाणे, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, औद्योगिक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करता येणार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

कामगारांनी दुचाकी, चारचाकी रस्त्यावर उभ्या करू नयेत. कंपनी आवारात वाहनतळाची सुविधा करावी. वाहने उभी करण्याची व्यवस्था नसल्यास संबंंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. त्यामुळे वाहन चोरीला जाणार नाही; तसेच वाहतूककोंडीही होणार नाही.- विनयुकमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड