लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नागरिकांशी एक्स (ट्विटर) समाजमाध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक समस्या, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था अशा विविध विषयांवर नागरिकांनी प्रश्न विचारले. त्यामध्ये एका गमतीशीर प्रश्नाचे पोलीस आयुक्तांनी देखील अतिशय गमतीशीर उत्तर दिले.

पोलीस कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) जनरेटेड गुन्हा दाखल करणार का, असा मजेशीर प्रश्न एका व्यक्तीने उपस्थित केला. त्यावर पोलीस आयुक्तांनी देखील मजेशीर उत्तर दिले. एफआयआर दाखल करण्यासाठी दोन्ही बाजूंची तक्रार समजून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत एआय दोन्ही बाजूंची तक्रार समजून घेत नाही, तोपर्यंत आम्हा पोलिसांच्या नोकऱ्या अबाधित आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. कार्यकाळ पूर्ण करणारे चौबे हे पहिले पोलीस आयुक्त ठरले आहेत. मागील वर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी देखील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांशी ‘एक्स’च्या माध्यमातून संवाद साधला. शहरातील गुन्हेगारी, वाहतूक, पोलीस आणि पोलीस आयुक्तालयाचे बळकटीकरण अशा विविध विषयांवर चौबे यांनी संवाद साधला.

रात्री उशिरापर्यंत साजरे होणारे वाढदिवस यावर एका व्यक्तीने प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना आयुक्तांनी सांगितले कि, शिस्तभंग केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही. सांगवी येथे पोलिसांकडून चूक झाली तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. शहरात पोलीस गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घातला जात आहे.

चारित्र्य पडताळणी संबंधात तक्रारींसाठी विशेष क्रमांक

पारपत्र (पासपोर्ट) काढताना संबंधित अर्जदाराची चारित्र्य पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत वेळ जात असून त्यासंबंधात काही तक्रारी असल्याचे चर्चेत सांगण्यात आले. त्यावर पोलीस आयुक्तांनी सविस्तर उत्तर दिले. पारपत्र संदर्भात येणाऱ्या कोणत्याही अडचणींबाबत पोलिसांकडून सहकार्य मिळवण्यासाठी ८०८७७०५११२ हा विशेष क्रमांक जारी केला आहे. यावर नागरिकांनी पारपत्र चारित्र्य पडताळणीसाठी येणाऱ्या तक्रारी मांडण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.

पोलीस आयुक्तांकडून कारवाईची आकडेवारी सादर

नो पार्किंग मध्ये वाहने पार्क करणे, वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणे अशा बाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सादर केली. यावेळी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे सांगितले. ५ डिसेंबर ते २६ मार्च या कालावधीत पदपाथवर वाहने पार्क करणाऱ्या २५ हजार २१० एवढ्या दुचाकी, पाच हजार ४११ चारचाकी वाहनांवर टोइंग कारवाई करण्यात आली आहे. एक जानेवारी पासून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या पाच हजार ७९२ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. मागील वर्षभरात मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या ४,१५४ जणांवर कारवाई केली आहे.

‘सीसीटीव्ही’द्वारे कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या आधारे देखील पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. एक जानेवारी २०२४ पासून २६ मार्च २०२५ पर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने एकूण ७५ हजार २३७ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातून एकूण सात कोटी ९६ लाख ३२ हजार १०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असल्याचे आयुक्त म्हणाले.

पिंपरी-चिंचवड मध्ये कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक गैरवर्तणुकीस अजिबात स्थान नाही. नागरिकांनी निर्भीडपणे पोलिसांकडे तक्रार करावी. कोणीही असो कारवाई केली आणि आणि यापुढेही निश्चित केली जाईल, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.