लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नववर्षाचे स्वागत करताना नागरिक, तसेच पब, हॉटेल, तसेच मद्यालयाच्या चालकांनी नियमांचे पालन करावे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
नववर्ष स्वागतासाठी शहर परिसरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यपान करून भरधाव वाहन चालविल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये. नियमांचे पालन करून सर्वांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करावे. मात्र, जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, मनोज चावरिया, विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते उपस्थित होते.
आणखी वाचा-सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार, मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी
नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून शहर, परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेतील ७०० पोलीस कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
गर्दीच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात तरुणाईची गर्दी होते. शहरातील १७ ठिकाणी गर्दी होते. त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. छेडछाड, चोरी अशा घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस वेगवेगळ्या भागांत गस्त घालणार आहेत. गर्दीत गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. गर्दीच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले
हॉटेल, पबचालकांना सूचना
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांतील हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडून ४० पार्टी, तसेच इव्हेंटना परवानगी देण्यात आली आहे. ध्वनिवर्धक, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. अल्पवयीनांना मद्यविक्री करू नये. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
नववर्ष स्वागताला मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालविण्यात येते. वेगामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांच्या घटना घडतात. पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहन चालविल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत जल्लोषात करावे. मात्र, जल्लोषाला गालबोट लागता कामा नये. -अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
© The Indian Express (P) Ltd