निवडणुकीच्या काळात पोलिसांवर नेहमीच पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला जातो. मात्र, तसे आरोप होतील, असे वर्तन पोलिसांनी करू नयेत. निवडणुकीत कोणाचीही बाजू घेऊ नका, अशी तंबी पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एका बैठकीत दिली.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस उपायुक्त परिमंडल ३ च्या वतीने हद्दीतील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची चिंचवडला बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, उपायुक्त डॉ. राजेंद्र माने, सहायक आयुक्त रमेश भुरेवार, स्मिता पाटील यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक या वेळी उपस्थित होते. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना पोलीस आयुक्तांनी या वेळी केल्या.
माथूर म्हणाले, सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करा, त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी योग्य त्या कायदेशीर बाबींचा वापर करा, निवडणुकांमध्ये पोलिसांवर उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांकडून नेहमीच आरोप केले जातात. तसे आरोप टाळण्याचा प्रयत्न करा. अधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप झाल्यास मी पाहून घेऊन. मात्र योग्य पद्धतीने कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू. गुन्हेगारांवर कारवाई करू शकत नाहीत, अशा अधिकाऱ्यांनी आताच अर्ज करून खात्यातून बाजूला व्हावे, असेही पोलीस आयुक्तांनी बजावले.