मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कार्यवाही नाही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख, वाढते औद्योगिकरण व वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. पिंपरीसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची तयारी झाली आहे. सर्व पायाभूत सुविधाही उभ्या राहिल्या आहेत. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी पोलीस आयुक्तालय रखडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी पुण्यातील कार्यक्रमात पिंपरीसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची निर्मिती लवकरच केली जाईल, अशी माहिती दिली होती. मात्र, स्थानिक राजकीय नेत्यांकडून होणारा पाठपुरावा कमी पडला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भरदिवसा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश पूर्वीपासून पुणे पोलीस आयुक्तालयात झाला आहे. पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी तशी जुनी आहे. मात्र, स्थानिक राजकीय नेत्यांकडून या मागणीचा पाठपुरावा केला जात नसल्यामुळे आयुक्तालयाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या रचनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश परिमंडल तीन अंतर्गत होतो. परिमंडल एक, दोन आणि चारच्या तुलनेत परिमंडल तीनमधील गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती अत्यावश्यक झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देणे गरजेचे आहे.

‘गुंडांवर जरब बसेल’

पिंपरी आयुक्तालयाची हद्ददेखील निश्चित झाली आहे. त्यात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित येणारा चाकण, देहूरोडसह आणखी काही महत्त्वाचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत चाकण परिसरातील खंडणीखोरांच्या त्रासाला तेथील उद्योजक वैतागले आहेत. पाच वर्षांपूर्वी तेथील उद्योजकांनी वाढत्या खंडणीखोरांची तक्रार थेट मुख्यमंत्र्याक डे केली होती. चाकण भागातील औद्योगिक वसाहतीतील कामगार कंत्राट तसेच भंगार माल कंत्राटावर गुंडांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या भागाचा पिंपरी आयुक्तालयात समावेश झाल्यास तेथील समस्या बऱ्याच प्रमाणात सुटतील, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पुण्यातून नियंत्रण ठेवल्यास परिस्थिती हाताबाहेर

हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच चाकण हा भाग हा औद्योगिकदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. औद्योगीकरण आणि नागरिकरणाचा वेग पाहता पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय गरजेचे आहे. प्रत्येक वेळी पुणे पोलीस आयुक्तालयातून या भागावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. भौगोलिक विस्तार पाहता स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police commissionerate work stuck due to lack of political will