सर्वसामान्य जनतेला पोलिसांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ व्हावे, त्याचप्रमाणे जवळपास घडणाऱ्या गुन्ह्य़ांची माहिती पुराव्यासह नागरिकांना कळविता यावी यासाठी राज्यात सर्वत्र पोलिसांनी व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू केले आहेत. त्यानुसार पुणे शहरासाठी ८९७५२८३१०० आणि ८९७५९५३१०० हे व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.
प्रत्येक परिक्षेत्रात जिल्हानिहाय वेगळे व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू करण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले होते. त्यानुसार राज्यात हे क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यास तातडीने त्याला प्रतिसाद देणे हा उद्देश हे क्रमांक सुरू करण्यामागे आहेत. महाराष्ट्र पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न दीक्षित यांनी महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सुरू केला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य दिले, तर समाजातील गैरप्रकारांना तातडीने आळा बसेल अशी भूमिका त्यांनी मांडली होती. या अंतर्गत प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याने स्वत:चे ई-मेल आयडी तयार करण्याचे आदेश दिले होते. आता पुढचे पाऊल टाकत सर्वसामान्यांना आपल्या तक्रारी मोबाईलच्या माध्यमातून करता याव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक वेगळा व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू करावा, असे आदेश दीक्षित यांनी दिले होते.
अनेकदा नागरिक पोलिसांना तक्रार करण्यास कचरतात किंवा परिसरात गैरप्रकार सुरू असले तरी पुराव्याअभावी त्यावर कारवाई करता येत नाही. अशा वेळी नागरिकांची मदत आम्हाला नक्कीच होईल. नागरिकांनी एखादी तक्रार केल्यानंतर त्यावर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असे प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा