डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यात विविध जिल्ह्य़ांत घेतलेल्या कार्यक्रमांपैकी अठरा कार्यक्रमांची माहिती पोलिसांनी काढली असून त्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमाचा बऱ्याचअंशी अभ्यास करण्यात आला असून त्यातून काही धागेदोरे मिळताहेत का, याची चाचपणी पोलीस घेत आहेत.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेले पण अजून हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही. पुणे गुन्हे शाखेबरोबरच राज्यातील पोलीस यंत्रणा हल्लेखोराचा तपास करत आहेत. भामरे म्हणाले, की  गेल्या काही वर्षांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेल्या काही कार्यक्रमांपैकी अठरा कार्यक्रमांची माहिती पोलिसांनी काढली आहे. त्यातून काही धागेदोरे मिळताहेत का पाहण्यात येत आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी मिळालेल्या दोन पुंगळ्या आणि दोन जिवंत काडतुसांचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे. डॉ. दाभोलकरांवर झाडलेल्या गोळ्या या एकाच अग्निशस्त्रातून झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील अशा प्रकारचे अग्निशस्त्र वापरून खून, खुनाचा प्रयत्न, अशा गुन्ह्य़ातील सराईत गुन्हेगारांची पडताळणी सुरू आहे. बहुतांश जणांची पडताळणी होत आली आहे. त्याच बरोबर राज्यातील अशाच गुन्ह्य़ातील सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये हल्लेखोरांशी मिळत्या-जुळत्या वर्णनाचे गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत १६९ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण गोळा केले असून त्यामधील ११७ ठिकाणचे चित्रीकरण पाहाण्याचे काम पूर्ण झाले आहे. यातील सात सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी दिसत आहेत.
तपास अन्य यंत्रणांकडे सोपवणार?
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटले, तरी पोलिसांना काहीच धागेदोरे मिळालेले नाहीत. पुणे गुन्हे शाखेकडे या गुन्ह्य़ाचा तपास असला, तरी मुंबई पोलीस, एटीएस आणि राज्यातील काही पोलीस या कामात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री ते गृहमंत्री या गुन्ह्य़ाची माहिती घेत आहे. पण, तपासाला यश येत नसल्यामुळे या गुन्ह्य़ाचा तपास अन्य यंत्रणांकडे दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस दलात चर्चा सुरू आहे.

Story img Loader