आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहू मधून जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. तर याच दरम्यान या दोन्ही पालख्यांचा मुक्काम काल पुण्यात होता. या दोन्ही पालख्या पुण्यातून काही वेळाने मार्गस्थ होतील. दरम्यान या पालख्यांच्या बंदोबस्तासाठी चाललेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या धडकेत पोलिसाच्या डोक्यावरून चाक गेले त्यामुळे पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. मिलिंद मकासरे असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. लष्कर पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार,लष्कर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक असलेले मिलिंद मकासरे हे पालखी मार्गाच्या बंदोबस्तासाठी पहाटे पाच सुमारास दुचाकीवरून फातीमानगरच्या दिशेने जात होते. क्रोम मॉल चौकाजवळ मकासरे त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा आधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.