देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून तरुणांना नक्षलवादी चळवळीशी जोडणारा नक्षलवादी अरुण भानुदास भेलके (वय ३८, रा. चंद्रपूर) आणि त्याची पत्नी कांचन ननावरे ऊर्फ सोनाली पाटील यांच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एटीएसने मंगळवारी न्यायालयात दिली. या दोघांकडे केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या असून त्यांच्या पोलीस कोठडीत १५ सप्टेंबपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
भेलके व त्याच्या पत्नीला पुणे एटीएसच्या पथकाने २ सप्टेंबर रोजी अटक केली होती. भेलके व त्याची पत्नी हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांचे सदस्य असून या संघटनेसाठी तरुणांची भरती करण्याचे काम करीत होते. जानेवारी २००८ मध्ये चंद्रपूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ात जामिनावर बाहेर आल्यानंतर भेलके हा फरार होता. एटीएसला मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने मंगळवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले.
पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी तपासाची माहिती दिली. या दोघांकडून लॅपटॉप आणि बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड मिळाले आहे. त्यांना नक्षलवादी कारवाईसाठी दरमहा पैसे मिळत होते. पैशांचा आर्थिक व्यवहार कांचन पाहात होती. या दोघांच्या संपर्कात असलेल्या तीसजणांची माहिती मिळाली आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. या दोघांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई प्रक्रिया सुरू आहे. या दोघांना पोलिसांबाबत काही तक्रार आहे का विचारल्यानंतर कांचन हिने पोलीस पतीला मारण्याची धमकी देत आहेत. ज्या व्यक्तीची माहिती त्याबाबत प्रश्न विचारतात, असे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने खरे ते बोला गेल्या वेळी मारहाण केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य आढळून आले नसल्याचे त्यांना सुनावले.

Story img Loader