पुणे शहर पोलीस दल, राज्य राखीव दल, बिनतारी विभाग, कारागृह प्रशिक्षण महाविद्यालय येथील मिळून चार अधिकारी आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ४७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात पुणे जिल्ह्य़ातील अकरा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार जयवंत पिंजण हे सध्या आरपीटीएस खंडाळा येथे कार्यरत असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्याचबरोबर कोथरूड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शंकर पवार यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांनी गडचिरोली भागात विशेष अभियान पथकाचे अधिकारी म्हणून काम केले आहे. नक्षलवाद्यांसोबत लढताना ते जखमी झाले होते.
बिनतारी विभागातील पोलीस उपनिरीक्षक केदार वर्तक यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून वर्तक यांनी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य स्पर्धेत एक रौप्य, चार कांस्य पदकांसह आजवर शंभरहून अधिक बक्षिसे मिळवली आहेत. पोलीस दलातील गोपनीय भाषा अध्यापनात त्यांचा हातखंडा आहे. पोलीस उपनिरीक्षक जलील अहमद अब्दुल रशीद काझी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून सध्या ते सहकारनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
सन्मान झालेल्या अन्य अधिकाऱ्यांची नावे अशी- (अधिकाऱ्याचे नाव, पद व नेमणुकीचे ठिकाण या क्रमाने.)
प्रदीप शामराव देसाई (सहायक पोलीस निरीक्षक), नेवजी हेमाजी मधे (सहायक पोलीस फौजदार एसआरपीएफ ग्रुप एक), दत्तात्रय बाबुराव गायकवाड (सहायक पोलीस फौजदार, एसआरपीएफ ग्रुप एक), कृष्णा चंदू सावंत (सहायक पोलीस फौजदार, एसआरपीएफ ग्रुप दोन), गोविंद शंकर मिस्तरी (पोलीस हवालदार, वायरलेस), दिलीप राऊ पाटील (सुभेदार, दौलतराव जाधव तुरुंग प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा), हंबीर शंकरराव शिंदे (सहायक पोलीस फौजदार, एसआरपीएफ ग्रुप पाच).
चार अधिकाऱ्यांसह अकरा जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ४७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 26-01-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police dept president medals republic day