नव्याने पारपत्र काढणाऱ्या पारपत्र अर्जदारांना आता आधी पारपत्र मिळून त्यानंतर त्यांची पोलिस चौकशी होणार आहे. पुणे विभागात (पुणे, सातारा, सांगली अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर) पारपत्र काढण्यासाठीच्या पोलिस चौकशीला सामान्य प्रक्रियेत साधारणपणे २१ ते ४० दिवस लागत असून हा वेळ कमी होऊन अर्ज केल्यापासून १० दिवसांत अर्जदाराच्या हाती पारपत्र पडू शकेल.
परराष्ट्र मंत्रालयातर्फे केवळ सामान्य प्रक्रियेतून नव्याने पारपत्र काढणाऱ्या अर्जदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. यात अर्जदाराकडे पारपत्र काढतेवेळी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. पारपत्र विभागात आधार कार्डाच्या पडताळणीची यंत्रणा उपलब्ध असून त्याद्वारे व्यक्तीच्या आधार क्रमांकाची ऑनलाईन पडताळणी केली जाईल. गरज भासल्यास पारपत्र खाते मतदार ओळखपत्र व पॅन कार्डचीही पडताळणी करेल. गोतसुर्वे म्हणाले,‘या शिवाय अर्जदाराने पारपत्र खात्याच्या संकेतस्थळावरील ‘अॅनेक्श्चर- आय’ हे प्रमाणपत्र भरुन देणेही गरजेचे आहे. अर्जदार भारताचा नागरिक आहे, वा तत्सम विशिष्ट माहिती या प्रमाणपत्रात द्यावी लागते. या चार गोष्टी अर्जदाराने उपलब्ध करुन दिल्यास त्याला पोलिस चौकशी न करताच प्रथम पारपत्र दिले जाईल व नंतर पोलिस चौकशी होईल. यामुळे अर्जदाराला सामान्य प्रक्रियेतही साधारणत: १० दिवसांत पारपत्र मिळेल. म्हणजेच सामान्य प्रक्रियेतील पारपत्र सेवाही तत्काळसारखीच होईल.’ पोलिस चौकशीचा अहवाल अर्जदाराच्या विरोधात गेला तर त्याला नोटिस बजावून पारपत्र कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही गोतसुर्वे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिस चौकशी मोबाईल अॅपवर!
परराष्ट्र मंत्रालयाने पोलिसांना पारपत्र अर्जदारांच्या पोलिस चौकशीचा अहवाल थेट ‘पेपरलेस’ पद्धतीने भरण्यासाठी ‘एमपासपोर्ट पोलिस अॅप’ हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. यात पोलिस चौकशीचा अहवाल कागदपत्रांवर न भरता तो अॅपच्या साहाय्याने भरला जाईल. पुण्यात अद्याप या अॅपचा वापर सुरू झालेला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police enquiry after passport