लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन सोहळ्यात ध्वनिवर्धक, ढोल-ताशांचा दणदणाट झाला. सलग ३८ तासांपेक्षा जास्त वेळ ध्वनिवर्धकांच्या भिंती आणि ढोल-पथकांच्या दणदणाटाला सामोरे गेलेल्या पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मंडळांवरील कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.

पुण्यातील विसर्जन सोहळा पाहण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक येतात. परदेशी नागरिक खास विसर्जन सोहळ्यात येतात. नेत्रदीपक रोषणाई, देखावे हे विसर्जन सोहळ्यातील आकर्षण असते. मात्र, पंधरा ते वीस वर्षांपासून विसर्जन सोहळ्यात ध्वनिवर्धकांच्या मोठाल्या भिंती उभ्या करण्याची स्पर्धा सुरू झाली. ढोलपथकांनी संख्येची मर्यादा ओलांडली. पथकात जास्तीत जास्त ढोल, ताशावादक सहभागी होऊ लागले.

हेही वाचा… पुणे मेट्रोत ‘टाईमपास’ बंद! प्रवास करण्याआधी जाणून घ्या नवीन नियम…

पुण्यातील विसर्जन मिरवणूक सोहळा यंदा ३० तास २५ मिनिटे सुरू राहिला. मंडईतील टिळक चैाकातून गुरुवारी (२८ सप्टेंबर) सकाळी सव्वादहाच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीची सांगता शुक्रवारी (२९ सप्टेंबर) दुपारी चार वाजून ४० मिनिटांनी झाली.

डोके गरगरले, कान बधिर

पोलिसांची अवस्था नागरिकांपेक्षा वेगळी नव्हती. पुणे पोलिसांनी सलग ३८ तास बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडेआठ हजार पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी झाले होते. ध्वनिवर्धकाच्या भिंतींसमोर पोलीस थांबले होते. ढोलपथकांचा दणदणाट सुरू होता. या दणदणाटाचा सर्वाधिक त्रास झाला. विसर्जन मिरवणुकीनंतर घरी गेल्यानंतर काही ऐकू येत नव्हते. डोके गरगरत हाेते. कान बधीर झाले होते. विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर सुन्न झाल्यासारखे वाटत होते, अशा तक्रारी प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी झालेले वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केल्या.

विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणामुळे त्रास झाल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. विसर्जन मिरवणुकीत ३८ तासांहून जास्त काळ पोलिसांनी बंदोबस्त पार पाडला. आवाजाचा पोलिसांना फार त्रास सहन करावा लागला. – रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे

विसर्जन सोहळ्यातील बंदोबस्तात अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांना बंदोबस्तात ध्वनिवर्धक, ढोलपथकांच्या आवाजाचा त्रास झाला. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास झाला आहे, अशा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिला आहे. ध्वनिप्रदूषणाची पातळी पोलिसांनी डेसिबल यंत्राद्वारे मोजली आहे. या नोंदीचे विश्लेषण करून कारवाई करण्यात येणार आहे. – संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police faced loudspeakers and dhol tasha sounds for more than 38 consecutive hours while ganesh visarjan procession pune print news rbk 25 dvr
Show comments