फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एका टोळक्याने केलेल्या मारहाणीमध्ये एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला. येरवडय़ातील जय जवाननगर येथे रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लाल महंमद हैदर साहब शेख (वय ५५, रा. रामनगर, येरवडा) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी शेख यांचा मुलगा अकील (वय २२) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रज्जाक हुसेन शेख, अब्दुल शेख, किरण ठाकूर, आनंदसिंग ऊर्फ काके (सर्व रा. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल महंमद शेख यांचे जय जवाननगर येथे टेलिरगचे दुकान आहे. थोरला मुलगा फारूक याला नोकरीला लावण्यासाठी त्यांनी रज्जाक व अब्दुल यांना चार वर्षांपूर्वी चार लाख रुपये दिले होते. मात्र, त्यांनी नोकरीचे काम केले नाही. त्यामुळे लाल महंमद शेख यांनी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली होती.
रज्जाक व अब्दुल यांनी पैसे परत न करता शेख यांना धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेमध्ये न वटता परत आले. त्यामुळे दोघांविरोधात शेख यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयात अद्याप निर्णय झालेला नाही. ही तक्रार मागे घ्यावी, या कारणावरून रविवारी रज्जाक व अब्दुल याच्यासह सहाजणांचे टोळके शेख यांच्या टेलिरगच्या दुकानात आले. कोयता, लोखंडी पाईप, स्टंप आदींच्या साहाय्याने त्यांनी लाल महंमद शेख यांना मारहाण केली. अकील व फारूक या त्यांच्या मुलांनाही त्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये लाल महंमद शेख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू
फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एका टोळक्याने केलेल्या मारहाणीमध्ये एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला.
First published on: 01-09-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police fight crime death