पुणे : पीएमपी बसचा मोटारीला धक्का लागल्याने झालेल्या वादावादीतून चौघांनी पीएमपी बस चालकाचे डोके फोडल्याची घटना टिळक रस्त्यावरील पूरम चौकात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले यांच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले, मुकेश पायगुडे, महेश बरगुडे आणि ढमाले यांचा नातेवाईक यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपी बसचालक शशांक यादवराव देशमाने यांनी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देशमाने स्वारगेट आगारात नियुक्तीस आहेत.
हेही वाचा >>> पुण्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी ; उदयाही पावसाची शक्यता
टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून (अभिनव चाैक) वळून पीएमपी बस बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्याकडे निघाली होती. पूरम चौकात मोटारीला बसचा पाठीमागून धक्का लागला. त्या वेळी मोटारीत भाजपच्या माजी नगरसेविक प्रतिभा ढमाले, मुकेश पायगुडे, महेश बरगुडे आणखी एक जण होता. बसचा धक्का मोटारीला लागल्याने पीएमपी चालक देशमाने यांच्याशी ढमाले, पायगुडे, बरगुडे आणि एका साथीदाराने वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी एकाने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून देशमाने यांच्या डोक्यात घातला. देशमाने गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर देशमाने सायंकाळी स्वारगेट पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी फिर्याद दिली. दरम्यान, ढमाले यांनी परस्पर विरोधी तक्रार दिली असून पीएमपी चालकाने हुज्जत घातल्याचे ढमाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.