बाल विकास अधिकाऱ्यांकडून चौकशी
पुणे : बाल न्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आलेल्या मुलीला अश्लील चाळे करण्यासाठी बळजबरी करणाऱ्या अधिपरिचारिकेविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला, ती समलिंगी असल्याचे ठसवून धमकावण्यात आले.
हेही वाचा >>> ‘ससून’चा पैसा सगळे मिळून खाऊ! रुग्णालयातील ४ कोटी रुपयांना असे फुटले पाय…
याबाबत जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षणगृहात दाखल करण्यात आलेल्या मुलींवर अधिपरिचारिकेकडून लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे ११ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तक्रारीनंतर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली. समितीत तीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली.
हेही वाचा >>> डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द केल्याने बुद्धिवंतांमध्ये नाराजी
समितीचे सदस्य निरीक्षणगृहात गेले. एका १६ वर्षीय मुलीकडे चौकशी करण्यात आली. त्या वेळी, ‘तू समलिंगी आहेस. संस्थेतील अन्य मुलींशी संबंध ठेव,’ असे अधिपरिचारिकेने धमकावल्याचे तिने समितीला सांगितले. ‘मला धमकावून बळजबरी केली, तसेच अश्लील कृत्य केले,’ असेही मुलगी म्हणाली. चौकशी समितीने याची गंभीर दखल घेऊन अधिपरिचारिकेविरुद्ध तक्रार दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) आणि भारतीय न्यायसंहितेचे कलम ७४, ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.